Previous Page     |      Next Page

उपासनेशिवाय अपुर्व, अद्रुष्ट निर्माण होत नाही. हा आपल्या भारतीय वैदिक संस्कृतीचा सिद्धांत आहे. त्यानुसार अतिप्राचीन कालापासून निरनिराळ्या उपासना आपल्या भारत देशात चालत आल्या आहेत. सध्याच्या या कलियुगामध्ये विनायक आणि चंडी उपासना ही सर्वात अतीशिघ्र फलदायी आहे, असे सांगितले आहे. चंडी-आदिशक्ती हे जगन्मातेचेच एक नाव आहे. ही चंडी या विश्वाच्या उत्पत्तीला, स्थितीला, आणि प्रलयाला कारणीभूत आहे. चंडी उपासना म्हणजेच आपल्या कुलदेवतेची उपासना होय. आपल्या कुलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी वेदशास्त्र, धर्मग्रंथ, पुराणामध्ये अनेक उपाय सांगितले आहेत. त्यामधील एक उपाय म्हणजेच सप्तशती पाठ वाचन होय.

देवीला सप्तशती म्हण्जेच देवीमहात्म्य अतीशय प्रिय आहे. या सप्तशती ग्रंथामध्ये देवीचे महात्म्य, स्तुती यांचे वर्णन केले आहे. सप्तशती म्हणजे सातशे श्लोक. या ग्रंथामध्ये एकुण तेरा अध्याय आहेत. अश्या या तेरा अध्यायांचे वाचन जर शास्त्रशुद्ध पध्दतीने केले तर आपल्याला त्याचा अनुभव आल्याशिवाय रहाणार नाही. या देशामध्ये सप्तशतीचा दररोज नित्यपाठ करणारे असंख्य लोक आहेत. याचा पाठ विशेषकरुन नवरात्रामध्ये वाचतात. परंतु सध्या कलीयुगामध्ये आपल्यावर येत असलेल्या संकटांवर जर मात करायची असेल तर सप्तशतीचे वाचन मात्र नित्य असावे. कर्म सकाम असो किंवा निष्काम असो, ते यथासांग शास्त्रवत घडलेच पाहिजे. तरच त्याची फलप्राप्ती सिद्ध होते. याची आपण जाणीव करुन घेतली पाहिजे.

महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या सगुण रुपांनी सत्प्रव्रुत्तांचे आणि सद्धर्मांचे प्रतिपालन आणि असत्प्रव्रुत्तीचे व त्यानुसार वागत असलेल्या मदोन्मत्त दैत्यांचे निर्दालन आदिशक्तीने प्रकट होऊन केले, त्याचा संपुर्ण इतिहास या सप्तशती ग्रंथामध्ये आलेला आहे. तेरा अध्यायांत सातशे श्लोकांनी ग्रथित झालेल्या या इतिहासाला उपासनेच्या दृष्टीने फार मोठे सिद्ध स्वरुप प्राप्त झालेले आहे. म्हणूनच या सप्तशती पाठांची शास्त्रशुद्ध उपासना आपल्या भारतवर्षांत रुढ झालेली आहे. या सप्तशती पाठाची उपासना सर्व अंगांसह करावी लागते. ज्याप्रमाणे अंगहीन अवयवहीन माणूस सर्व कर्म करण्याला असमर्थ असतो, त्याप्रमाणे षडंगाशिवाय केलेला पाठ फलदायी होत नाही. म्हणून कवचादि सहा अंगयुक्त असा सप्तशतीचा पाठ करावा लागतो. त्याच पद्धतीने स्वतःसाठी किंवा जनकल्याणासाठी एका पाठापासून नवचंडी, शतचंडी, सहस्त्रचंडी, दशसहस्त्रचंडी, लक्षचंडी, कोटीचंडी पर्यंतची उपासना आजही सुरू आहे.

या सप्तशती ग्रंथाचा पाठ करण्याची एक शास्त्रीय पद्धत आहे. त्या पद्धतीच्या परंपरेनुसारच तो पाठ करावा लागतो. त्याची माहिती पुढे देत आहोत. प्रथम स्वतःच्या कपाळाला कुंकू लावून आसनावर बसावे. आचमन करावे. त्यानंतर मनातील हेतू पूर्ण होण्याच्या दृष्टीने संकल्प करावा. सप्तशती ग्रंथाची पूजा करावी. प्रथम देवीकवच, अर्गलास्तोत्र, कीलकस्तोत्र वाचून मग रात्रीसूक्त वाचावे. न्यास करून नवार्णमंत्राचा जप विधीवत करावा. पुन्हा न्यास करून देवीचे ध्यान करावे. पहिल्या अध्यायापासून तेरा अध्याय वाचावे. नंतर पुन्हा न्यास, जप, न्यास करावे. त्यानंतर देवीसूक्त म्हणून प्राधानिक, वैकृतिक, मूर्ती रहस्य वाचावे. देवीअपराध क्षमापन स्तोत्र वाचून सिध्दकुंजिकास्तोत्र वाचावे. ग्रंथाची पूजा करून देवीला नैवेद्य दाखवावा. हे वाचन देवीला अर्पण करावे. अश्या पद्धतीने वाचन केले म्हणजेच सप्तशतीचा एक पाठ पूर्ण होतो. असे दहा, शंभर, हजार, लक्ष पाठ पूर्ण करावे.

एकाचवेळी एकापेक्षा जास्त पाठ करावयाचे असल्यास तसा पाठाचा संकल्प करावा. देवीकवच, अर्गलास्तोत्र, कीलकस्तोत्र, रात्रीसूक्त वाचावे. न्यास करून नवार्ण मंत्राचा जप करावा. पुन्हा न्यास करावे. एक ते तेरा अध्याय वाचावे. न्यास करून नवार्णमंत्राचा जप करावा. पुन्हा न्यास करावे. पुन्हा सप्तशतीचे तेरा अध्याय वाचावे. शेवटी न्यास झाल्यानंतर प्राधानिक, वैकृतिक, मूर्तीरहस्य वाचून देवीची क्षमा मागावी. सिध्दकुंजिकास्तोत्र वाचून पाठाची सांगता करावी.

 • नवचंडी याग म्हणजे सप्तशतीचे दहा पाठ वाचून एका पाठाचे हवन करावे.
 • शतचंडी याग म्हणजे सप्तशतीचे शंभर पाठ वाचून दहा पाठाचे हवन करावे.
 • सहस्त्रचंडी याग म्हणजे सप्तशतीचे हजार पाठ वाचून शंभर पाठाचे हवन करावे.

कलीयुगामध्ये आपण नाना प्रकारच्या संकटांना तोंड देत असतो. त्या संकटातून आपली सुटका करण्यासाठी देवीउपासना हे एक प्रभावी अनुष्ठान आहे, या उपासनेने आपले संकट दूर होऊन आपली मनोकामना सिद्ध होते, यात काही संशय नाही. एखादा विशेष संकल्प असल्यास त्याला अनुरूप असा योग्य मंत्र घेऊन पल्लवित किंवा संपुटीत पाठाचे अनुष्ठान करता येते.

 • विशीष्ट संकल्प
 • १. कुलदेवता कृपाआशिर्वाद मिळविण्यासाठी
 • २. मुलीचा विवाह जमविण्यासाठी
 • ३. लक्ष्मी प्राप्तीसाठी
 • ४. बाधा नाश होण्यासाठी
 • ५. अपमृत्यु टाळण्यासाठी
 • ६. विश्वाच्या कल्याणासाठी
 • ७. सुलक्षणीय पत्नीप्राप्तीसाठी
 • ८. संतती प्राप्ती साठी
 • प्रभावी मंत्र
 • नमो देव्यै महादेव्यै..................
 • सर्व मंगल मांगल्ये..................
 • कांसो स्मिता............................
 • सर्वाबाधा प्रशमनं.................
 • त्र्यंबकं यजामहे......................
 • देव्या यया ततमिदं....................
 • पत्नीं मनोरमां.......................
 • देवकीसुत गोविंद........................

असे विविध प्रकारचे प्रभावी मंत्र घेउन नवचंडी, शतचंडी याग अनुष्ठान करता येते.

योग शांती यादी